गोंदिया(अनिल मुनिश्वर):–
स्वराज्य संकल्पक, राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा प्रसार करणारी ‘जिजाऊ रथयात्रा’ येत्या 12 एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल होणार आहे. यानिमित्ताने नवेगावबांध परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रथयात्रेत मतभेद विसरून सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री इंजिनियर सुनील तरोणे यांनी केले आहे.
नवेगावबांध येथील ग्रीन पार्क रेस्टॉरंटमध्ये आयोजित नियोजन बैठकीत तरोणे बोलत होते. त्यांनी सांगितले की, लाखांदूर येथून सुरुवात होणारी रथयात्रा धाबे टेकडी येथे सायंकाळी चार वाजता पोहोचेल. त्यानंतर अर्जुनी मोरगाव येथे महाराणा प्रताप चौकात भव्य सभा होईल. तसेच नवेगावबांध येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे आयोजनही करण्यात आले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष क्रांतीसिंह ब्राह्मणकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा संयोजिका सविताताई बेदरकर, सुनीताताई भेलावे, पद्मजा मेहेंदळे, प्रबोधनकार मुक्ताबाई हत्तीमारे, अनिल मुनिश्वर,प्रशांत गायधने,रामदास बोरकर, आदर्श सरपंच दादा संग्रामे,लोकपाल गहाणे, विजय डोये, चेतन डोये, होमदास ब्राह्मणकर,उद्धव मेहंदळे,कृष्णकांत खोटेले, प्रकाश शिवनकर,आरती चव्हाण, मंजू शिवणकर प्रिया हरडे,तेजस्विनी पडोले,सारिका रंगारी,मीनल टेंबरे, सुनीता ब्रह्मपुरे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील तरोणे यांनी गावागावातील शिवप्रेमी, जिजाऊ व संभाजी ब्रिगेडचे सदस्य व नागरिकांना ढोल-ताशांच्या गजरात रथयात्रेचे स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. ही रथयात्रा केवळ धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम नसून, ती समाजातील ताणतणाव, जातीभेद आणि भेदभाव मिटवून माणुसकीचा संदेश देणारी चळवळ आहे, असे मत रामचंद्र सालेकर यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने गेल्या ३५ वर्षांपासून शिव, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या या यात्रेची सुरुवात 18 मार्च रोजी वेरूळ येथून झाली असून, 1 मे रोजी पुण्यातील लालमहालात तिचा समारोप होणार आहे.
सध्याच्या सामाजिक आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, ही यात्रा समाजाला नवसंजीवनी देणारी ठरत आहे. नवेगावबांधकरांनीही या ऐतिहासिक क्षणासाठी सज्जता दर्शवली असून, ठिकठिकाणी स्वागत समित्या, रांगोळ्या, बॅनर, झेंडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे.
ही यात्रा केवळ एक सांघिक चाल नाही, तर मानवी मूल्यांची उजळणी करणारी ऐतिहासिक चळवळ आहे. नवेगावबांध व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जनतेसाठी ही एक अभिमानाची संधी असून, इतिहास घडवण्यासाठी सर्वांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


