“नारीला निरोगी, सक्षम आणि समृद्ध बनवणे हेच आमचे संकल्प” – आमदार विनोद अग्रवाल”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):——————-
स्त्रिया आज कुटुंबाची मोठी जबाबदारी पार पाडत असतानाच प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन यशस्वी होत आहेत. परंतु स्वतःच्या आरोग्याबाबत अद्यापही स्त्रिया गंभीर नाहीत. महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजे १७ सप्टेंबरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत (२ ऑक्टोबर) “निरोगी नारी – सक्षम कुटुंब” हा अभियान राबवून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केला आहे.

या अभियानाच्या प्रारंभी आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार प्रत्येक घटकाला बळकट करण्याबरोबरच नारीशक्तीला सक्षम व समृद्ध करण्यावर विशेष भर देत आहे.

आमदार अग्रवाल म्हणाले, आज आपण आरोग्यसेवेत मोठी सुधारणा केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवेतील मोठे बदल घडले आहेत. माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय आरोग्यसेवेची सुरुवात झाली, ज्यामुळे महागड्या उपचारामुळे होणारा जीविताचा धोका कमी झाला. शासन पातळीवर आज देशात मोठमोठी एम्स हॉस्पिटल्स, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालये उभी राहत आहेत. ग्रामीण भागात आरोग्यसेवा वाढविण्याचे कार्य झाले असून त्याचा परिणाम म्हणून आज महागडे उपचारदेखील मोफत उपलब्ध होऊन सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

अग्रवाल पुढे म्हणाले की, गोंदियात मेडिकल कॉलेज सुरु आहे, उत्तम आरोग्यसुविधा पुरवल्या जात आहेत. मेडिकल कॉलेजची नवी भव्य इमारत उभारणीच्या मार्गावर आहे. टीबी हॉस्पिटलच्या जागी एक आधुनिक रुग्णालय उभारले जाणार आहे. केटीएस आणि गंगाबाई जिल्हा रुग्णालयातूनही चांगल्या आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत.

त्यांनी सांगितले, महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्या कुटुंबाची कणा आहेत, त्यांच्यावरच आपण अवलंबून आहोत. म्हणून महिलांना जास्तीत जास्त आरोग्यसेवेचा लाभ मिळावा यासाठी “निरोगी नारी – सक्षम कुटुंब” अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान आपण सर्वांनी मिळून यशस्वी केले पाहिजे, हाच आपला संकल्प असला पाहिजे.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, मला अभिमान वाटतो की मी अशा जिल्ह्याचे व विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो, जिथे ईश्वरी सेवा व मानवसेवा करणारे असंख्य ईश्वरी दूत आहेत. गोंदिया अवयवदान व नेत्रदानात अग्रगण्य राहिले आहे. मृत्यूनंतर अवयवदान व नेत्रदान करून अनेकांना नवे जीवन देण्याचे कार्य गोंदियातील या सेवकांनी केले आहे. यामुळे सामान्यांमध्ये जनजागृती निर्माण झाली आहे.

कार्यक्रमाला आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, भाजप जिलाध्यक्ष सिताताई रहांगडाले, गजेन्द्र फुंडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार, नोडल अधिकारी डॉ. श्याम निमगडे, डाँ. सुवर्णा हुबेकर आदींसह महिला आरोग्य कर्मचारी, मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक, डॉक्टर आदी उपस्थित होते.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें