गोंदिया(अनिल मुनिश्वर):————–—– दि. १२ सप्टेंबर:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींविषयी काँग्रेसने प्रसारित केलेल्या एआय व्हिडिओच्या निषेधार्थ आज गोंदिया शहरात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील सारस चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व आमदार चित्रा वाघ यांनी केले. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजप जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटेले, भेरसिंग नागपुरे, भजनदास वैद्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, विजय शिवणकर, पंकज रहांगडाले यांच्यासह भाजपचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत त्वरित कारवाईची मागणी केली. काँग्रेसने राजकारणाच्या नावाखाली मातृत्वाचा अपमान केला असून जनतेला गोंधळात टाकण्याचा हा प्रकार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला व काँग्रेसच्या व्हिडिओ मोहिमेवर कडाडून हल्ला चढवला. तसेच या संदर्भातील निवेदन पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.
