मुंबई(अनिल मुनिश्वर):——————- दि. ७ जुलै २०२५: गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उद्दिष्टा अभावी रखडलेल्या धान खरेदीच्या समस्यांकडे लक्ष वेधणाऱ्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मागणीला यश आले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्याला प्रतिसाद देत राज्य सरकारने धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोबतच धान खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हो खरेदी २० जुलै २०२५ पर्यंत सुरू राहील.
आ. बडोले यांनी २ जुलै २०२५ रोजी विधानसभेत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. यावर्षी उन्हाळी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असताना खरेदी प्रक्रिया अर्धवट थांबवल्याने शेतकऱ्यांचे धान शिल्लक राहिले होते. यामुळे धान खराब होण्याची भीती आणि आर्थिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. त्यांनी धान खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती.
शेतकऱ्यांच्या मागणीला यश
आ.बडोले यांनी उपस्थित केलेल्या या गंभीर मुद्द्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवण्यात आले आहे. या निर्णयामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे धान विक्री करण्याची संधी मिळणार असून, आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांना आशेचा किरण
गोंदिया आणि भंडारा हे धान उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हे असून, येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रामुख्याने धान पिकावर अवलंबून आहे. धान खरेदीची मर्यादा वाढवण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. “हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यामुळे पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना स्थैर्य मिळेल,” असे आ. बडोले यांनी सांगितले.









