गोंदिया(अनिल मुनिश्वर):—————–०५ जुलै
चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नगर भूमापन (सिटी सर्वे) कामाच्या संथ गतीबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांनी नाराजी व्यक्त करून हे काम जलदगतीने करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
4 जुलै रोजी गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शहर भूमापन व शहरातील विविध समस्यांबाबत बैठक झाली. यावेळी एसडीओ चंद्रभान खंडाईत, उपअधीक्षक भूमी अभिलेख अजय शिरसागर, अतिरिक्त तहसीलदार तथा मुख्याधिकारी श्रीकांत कांबडे, तहसीलदार समशेर पठाण, सुनील केळंका, ऋषिकांत साहू, विवेक मिश्रा, जितेश टेंभरे, लिमेंद्र बिसेन, नुरुनाथ दिहारी, नगर रचना विभागाचे श्री तुरकर, मेश्राम व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आमदार विनोद अग्रवाल यांनी शहरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या नगर भूमापन सर्वेक्षणाच्या (सिटी सर्वे) कामाचा आढावा घेतला. शहर सर्वेक्षणा सिटी सर्वेच्या कामासाठी पुनर्मापन, ड्रोन सर्वेक्षण, स्पॉट सर्वे सोबतच त्यांनी शहरी हद्दीला लागून असलेल्या फुलचूर, कटंगी, कुडवा, मुर्री, पिंडकेपार, गोंदिया खुर्द आणि गोंदिया बुजुर्ग या ७ गावांमध्ये झालेल्या कामाची माहिती घेतली.
नगर भूमापन आणि पुनर्मोजणी काम संथ गतीने सुरू असल्याचे निर्देशनास आले. त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी नाराजी व्यक्त केली आणि हे काम जलदगतीने करण्याचे निर्देश दिले. सर्वेक्षणासाठी पथक वाढवा, नकाशा अंतिम करण्याचे काम जलद करा आणि आठवड्यात २०० मालमत्तांचे उद्दिष्ट पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या. या कामावर दर आठवड्याला बैठक घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
८ दिवसांत दुकान/खोल्या
लीलाव करण्यासाठी सूचना…
बैठकीत आमदार विनोद अग्रवाल यांनी नगर परिषदेने बांधलेल्या संकुलांमधील खोल्या/दुकाने महिनोनमहिने भाड्याने न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, नगर पालिका उत्पन्नावर लक्ष केंद्रित करत नाही, देखभालीवर लक्ष्य केंद्रित करत नाही. दुकाने रिकामी पडून आहेत पण ती का भाड्याने दिली जात नाहीत हे समजण्यापलीकडे आहे. त्यांनी हे खोल्या/दुकानें भाड्याने देण्याचे आणि त्याबद्दल ८ दिवसांत माहिती देण्याचे कडक निर्देश दिले.
स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करा
घंटा गाडी खरेदी करा…
बैठकीत आमदार विनोद अग्रवाल यांनी बाजार परिसरात आणि मटण मार्केट परिसरात टाकल्या जाणाऱ्या मासांहारी वेस्ट मटेरियल, कचराकुंडीची आणि कचरा उचलला जात नसल्याची गंभीर दखल घेतली. ते म्हणाले की, जर दुकानदारांनी स्वतः कचरा अनियमितपणे टाकला तर त्याचा परिणाम संपूर्ण परिसरात दिसून येईल. मटण आणि मासे मार्केट परिसरात मांसाहारी कचरा इकडे तिकडे फेकल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांनी मटण आणि मासळी मार्केटमधील स्वच्छतेची काळजी घेत तेथे कचरा वाहन उभे ठेवण्याचे आणि दुकानदारांना कचरा त्यात टाकण्याचे आदेश देण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर बाजार परिसरातून कचरा गोळा करण्यासाठी १० नवीन कचरा वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
