गोंदिया(अनिल मुनिश्वर):-
**********************
गोंदिया जिल्ह्यात किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गोंदिया आणि देवरी येथील शासकीय रुग्णालयांमध्ये ही सेवा सुरू असून,रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय आधार मिळत आहे.मूत्रपिंड निकामी होणे,मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या कारणांमुळे डायलिसिसची गरज वाढत आहे.जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आधुनिक डायलिसिस मशिन्स उपलब्ध असून,तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.या मोफत सुविधेमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवरील खर्चाचा बोजा कमी झाला आहे,आणि त्यांना नियमित उपचार घेणे शक्य झाले आहे.
डायलिसिसचे कार्य
डायलिसिस ही अशी वैद्यकीय प्रक्रिया आहे,ज्यामध्ये मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करू न शकल्यास रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकले जातात. मूत्रपिंडाचे कार्य कमी होण्यामागे मधुमेह, उच्च रक्तदाब, कुपोषण आणि इतर काही आजार कारणीभूत ठरतात. मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे, कारण उच्च रक्तातील साखर मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवते. त्याचप्रमाणे, उच्च रक्तदाबामुळेही मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे त्यांचे कार्य मंदावते. याशिवाय, काही औषधे, विषारी पदार्थ आणि कुपोषणामुळेही मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. या सर्व कारणांमुळे डायलिसिसची आवश्यकता वाढत आहे, आणि जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.अशी माहिती
डायलिसिस केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितली
के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसिस साठी 7 मशिन्स आहेत काविळ रुग्णा साठी स्वतंत्र मशीन आहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 संपूर्ण वर्ष भरात सुमारे 4860 डायलिसिस सत्र के टी एस मध्ये यशस्वीपणे झालेली आहेत.
या केंद्रात फक्त गोंदिया भंडारा जिल्ह्यातीलच नाही तर शेजारील मध्य प्रदेश,छत्तीसगड मधून बालाघाट,किरणापूर,लांजी येथून गरजू रुग्ण के टी एस येथील डायलिसिस केंद्रात उपचार घेत आहेत सुमारे 48नोंदणीकृत रुग्ण शिफ्ट वाइज केंद्रात डायलिसिस साठी के टी एस ला येतात त्यांचे महात्मा जोतिबा फुले जीवन दायी योजना अंतर्गत मोफत डायलिसिस करून देण्यात येते अशी माहिती डायलिसिस केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी दिली.
देवरी येथील डायलिसिस साठी 4 मशिन्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे गेल्या चार महिन्यांत २०० ते २५० डायलिसिस सत्रे पूर्ण झाली आहेत. देवरी येथे 4 मशिन्ससह केंद्र पी पी पी तत्वावर एच एल एल कंपनी तर्फे कार्यान्वित झाले आहे. या केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर अधीक्षक डॉ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रशिक्षित कर्मचारी टीम रुग्णांवर उपचार करतात. किडनीच्या समस्येमुळे रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागते, आणि ही प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते. शासकीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा मोफत उपलब्ध असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांमधील महागड्या उपचारांचा खर्च वाचत आहे. यामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालयात पी एम डायलिसिस केंद्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मोहबे यांच्या मार्गदर्शनाखाली व आर एम ओ डॉ गुरुप्रसाद खोब्रागडे आणि डॉ सुवर्णा हुबेकर आणि डॉ मयंक
जैस्वाल आणि आय पी एच एस जिल्हा
समन्यवयक डॉ सुवर्णा उपाध्याय यांची टीम कार्यरत आहे
या वेळी माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबरीश मोहबे यांनी सांगितले की,शासनाच्या या मोफत डायलिसिस योजनेचा लाभ अनेक रुग्ण घेत आहेत. गोंदिया आणि देवरी येथील केंद्रांमध्ये डायलिसिस मशिन्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे रुग्णांना नियमित आणि वेळेवर उपचार मिळतात. ही सुविधा रुग्णांचे आयुष्य सुलभ करत असून, त्यांच्या जीवनमानात सुधारणा करत आहे. तथापि, डायलिसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, भविष्यात आणखी मशिन्स आणि केंद्रांची आवश्यकता भासू शकते. नागरिकांनी मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवून किडनीच्या आजारांना प्रतिबंध करावा,असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे.
