गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————- समाजातील सर्वच स्तरातील लोकांना सोबत घेऊन त्यांना सहकार्य व मदत करणे हेच आपले परम कर्तव्य असले पाहिजे. समाजसेवा व लोकसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. लायकराम भेंडारकर यांनी केले.
त्यांच्या वाढदिवशी त्यांची जन्मभूमी इंजोरी येथे आयोजित मोफत रोगनिदान शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. सिताताई रहांगडाले भाजपा जिल्हाध्यक्ष गोंदिया, उद्घाटक मा. विरेंद्रजी उर्फ बाळाभाऊ अंजनकर भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र समन्वयक, विशेष अतिथी मा. लक्ष्मणजी भगत बांधकाम सभापती जिप गोंदिया, मा. यशवंतजी गणवीर माजी उपाध्यक्ष, मा.सविताताई पुराम माजी सभापती, निशाताई तोडासे जि.प. सदस्य आम्रपालीताई डोंगरवार सभापती पं. स. अर्जुनी/मोर, चित्रकलाताई डोंगरे सभापती पं स गोरेगाव, पल्लवी वाडेकर गटविकास अधिकारी पं.स. अर्जुनी/ मोर, केवळरामजी पुस्तोडे, होमराजजी पुस्तोडे, पारधीजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील जनतेसाठी मोफत रोगनिदान शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. नेत्ररोग, स्त्रीरोग, हृदयरोग बालरोग, कान-नाक-घसा रोग अशा अनेक तज्ञ डॉक्टरांची चमू याप्रसंगी इंजोरी नगरीत दाखल झाली होती.
या मोफत रोग निदान शिबिराचा हजाराच्या वर लोकांनी लाभ घेतला .. तसेच पाचशेच्या वर लोकांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच ५८ लोकांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.
सदैव लोकहिताला प्राधान्य देणारे जनसामान्यांचे नेते अशी लायकराभाऊ भेंडारकर यांची संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळीओळख आहे. वाढदिवसाच्या दिवशीही जनसामान्यांच्या सेवेला प्राधान्य देत मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या लायकरामभाऊ भेंडारकर यांचे सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांनी साधी राहणी व उच्च विचारसरणी या तत्वाला अनुसरणारे एक द्रष्टे व लोकसेवक नेते अशा शब्दांत लायकरामभाऊ भेंडारकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठोबा रोकडे यांनी सादर केले. सुत्रसंचालन नमिता लंजे यांनी केले.








