सडक अर्जुनी (अनिल मुनीश्वर): दि. २२ ऑक्टोबर :
सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करण्याच्या हेतूने आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील माहुर्ली आणि बिर्री येथे बहुरूपी समाजातील बांधव-भगिनींशी दीपावलीचा उत्सव साजरा केला.
या भेटीदरम्यान आमदार बडोले यांनी बहुरूपी समाजाच्या वस्तीवर जाऊन सर्व बांधवांशी सखोल संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, शैक्षणिक सुविधा, रोजगाराच्या संधी तसेच मूलभूत गरजा या संदर्भातील समस्यांची माहिती घेतली. समाजाला शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार बडोले म्हणाले की, बहुरूपी समाज हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य घटक असून या समाजाचे पुनर्वसन, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रभावी पावले उचलण्यात येतील.
दिपावलीच्या उत्सवानिमित्त आमदार बडोले यांनी उपस्थित बांधव-भगिनींना शुभेच्छा देत, समाजातील मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या निशाताई तोडासे, डॉ. राहुल ठवरे, अजित डोंगरवार, शुभम जगबंधु, राजकुमार डोंगरवार यांच्यासह मोठ्या संख्येने समाजातील बांधव भगिनी उपस्थित होते.
