नवेगावबांध(अनिल मुनिश्वर)दिनांक 28/06/25
===========================
वनविभागातील आपल्या सेवाकाळात सर्वाधिक काळ वास्तव्यास असलेल्या नवेगावबांध येथे वनमहर्षी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना वनविभागाच्या वतीने आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
चितमपल्लींच्या मृत्यूपत्रातील इच्छेनुसार त्यांच्या पावन अस्थी नवेगावबांध येथील नवेगावबांध तळ्यात विसर्जित करण्यात आल्या.
त्यांनी मृत्यूपत्रातून जांभूळझरी येथील माधवराव पाटलांच्या समाधी शेजारी स्मारक व्हावे अशी इच्छाही प्रदर्शित केली होती.
चितमपल्ली यांचे संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सान्निध्यात, पशु-पक्षी-प्राणी यांचे जतन करण्यात गेले. पशुपक्ष्यांच्या अधिवासांचे जतन करण्याकडे त्यांचा ओढा असायचा. पशुपक्ष्यांचे आवडता आणि हक्काचा अधिवास म्हणजे वड आणि पिंपळ. कारण ह्या वृक्षांचे आयुष्य शेकडो वर्षांचे असते. हेच ध्यानात ठेवून माधवराव पाटलांच्या समाधी शेजारी वडाचे झाड लावून त्यांना वनखात्यातर्फे आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिवंगत चितमपल्ली साहेबानांही जंगलात सिमेंट कॉंक्रिटची समाधी अपेक्षित नसणार अशी श्रध्दा ठेवून ही अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर वृक्षारोपण श्रीलक्ष्मी (IFS) वनसंरक्षक (प्रादेशिक), श्री. जयरामे गौडा (IFS) क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि श्री. पवन जोंग (IFS) उपवनसंरक्षक, गोंदिया यांच्या पुढाकाराने अतुल देवकर (DFO वन्यजीव नवेगाव-नागझिरा), अविनाश मेश्राम (सहा. वन संरक्षक), सदाशिव अवघान (वन परिक्षेत्र अधिकारी) व इतर अनेक वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले. यासाठी खास नागपूरहून चंद्रकांत रागीट, मारुती चितमपल्ली यांच्या बहुतांश पुस्तकांचे प्रकाशक मकरंद कुलकर्णी, तर वर्ध्याहून कौशल मिश्रा, एन व्ही हूड,अॅड.ताम्रध्वज बोरकर, बुद्धदास मिरगे, राजदीप राठोर, शाहरूख इनामदार व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
