20 जानेवारीला सभापती -उपसभापती पदासाठी निवडणूक
गोंदिया(अनिल गो.मुनीश्र्वर):–
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सभापती पदासाठी आज तारीख 10 जानेवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षणाची सोडत निघाली असून अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव निघाल्याने अनुसूचित जाती प्रवर्गातून एकमेव सदस्य असलेल्या व गोठणगाव गणातून निवडून आलेल्या आम्रपाली डोंगरवार ह्या एकमेव असल्याने त्या बिनविरोध सभापती पदी विराजमान होणार आहेत. तर सभापती उपसभापती ची निवड 20 जानेवारीला होणार असून पिठाशीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे राहणार आहेत.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमध्ये 14 सदस्य असून यामध्ये वंचित एक,भाजपा सात,राष्ट्रवादी काँग्रेस दोन,काँग्रेस चार,असे पक्षीय बलाबल आहे. यापूर्वी अडीच वर्षासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षणात भाजपाचे सहकार्याने वंचितच्या सविता कोडापे सभापती बनल्या होत्या. आता अडीच वर्षाचा कालावधीसाठी आज तारीख 10 जानेवारी रोजी सभापती पदाची सोडत काढण्यात आली असून अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सभापतीसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाला आहे. त्यामुळे गोठणगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आलेल्या आम्रपाली डोंगरवार हा एकमेव अनुसूचित जाती महिला सदस्य असल्याने आपसूकच सभापती पदाची माळ त्यांचे गळ्यात पडली आहे. राष्ट्रवादीच्या आम्रपाली डोंगरवार या गोंदिया जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष व गोठणगाव क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर यांच्या निकटवर्तीय असल्याचे समजते. आता 20 जानेवारीला सभापती व उपसभापती पदासाठी निवड होणार असून उपसभापती कोण होणार या चर्चांना उधान आले आहे. सध्या महायुती असून उपसभापती पदावर भाजपचा सदस्य निवडल्या जाणार असून भाजपकडे पाच पुरुष व दोन महिला सदस्य आहेत. त्यामुळे संदीप कापगते,नूतन सोनवाणे,नाजूक कुंभरे,यापैकी एकाची उपसभापती पदी वर्णी लागु शकते ? उपसभापती पदासाठी मोठी रस्सी खेच होणार असे चित्र आतापासूनच दिसायला लागले आहेत.