मुंबई : अनिल मुनीश्वर (मुख्य संपादक)
विधानसभेतील घवघवीत यशानंतर अखेर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गट हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावासाठी आग्रही होता.
मात्र अखेर वाटाघाटीनंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.
फडणवीसांना तिसऱ्यांदा संधी
यापूर्वी २०१४ ते २०१९ या पंचवार्षीकमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सलग पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. त्यानंतर २०१९ मध्ये सत्तासंघर्षातही त्यांनी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले. त्यानंतर आता पुन्हा २०२४ मध्ये ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री होण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे.
राज्यात २० मंत्री घेणार शपथ
मिळालेल्या माहितीनुसार नव्या मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे १०, शिंदे गटाचे सहा तर अजित पवार गटाचे ४ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकीत भाजप सर्वाधिक १३२ जागा जिंकत राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्याखालोखाल शिंदे गटाने ५७ तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, तेच सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.