AGM News24

Latest Online Breaking News

सौंदड ग्राम पंचायतीने वाढविला गोंदिया जिल्ह्याचा गौरव

  • ‘माझी वसुंधरा’ अभियानात विभागात सर्वोत्तम कामगिरी
  • राज्य सरकारने केला सन्मान

गोंदिया, सडक-अर्जुनी. दिंनाक -८ जुन २०२२ : विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामोन्नती साधणारी जिल्ह्यातील सर्वात मोठी सौंदड ग्राम पंचायत पुन्हा एकदा नावारूपास आली आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानात विभागात सर्वोत्तम कामगिरी करत या ग्राम पंचायतीने केवळ गावाचाच नव्हे, तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा गौरव वाढविला असून या बद्दल राज्य सरकार कडून नुकताच सन्मान देखील करण्यात आला आहे.

ग्लोबल वॉर्मिगमुळे आज पर्यावरणाची मोठी हानी झाली असून सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. पृथ्वीचा विनाश थांबवायचा असेल तर पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण शिवाय पर्याय नाही. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार कडून ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यभर राबवून भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. यात सौंदड ग्राम पंचायतीने नागपूर विभागात सर्वोत्तम कामगिरी केली असल्याची बाब मूल्यमापनाच्या माध्यमातून निदर्शनास आली. राज्यातील अशा होतकरू ग्राम पंचायतींचा सन्मान सोहळा मुंबई येथे रविवार, 5 जून 2022 रोजी पार पडला.

या शाही सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. तर विशेष अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण संवर्धन मंत्री आदित्य ठाकरे, मनीषा म्हैसकर भा.प्र.से, आणि पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव उपस्थीत होते. यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायत सौंदड चा सन्मान करण्यात आला. सरपंच गायत्री इरले, ग्राम विकास अधिकारी जगदीश नागलवाडे, ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत यशस्वी होण्याकरीता विशेष परिश्रम घेणारे युवा नेटवर्क समुहाचे संस्थापक वृक्षमित्र रोशन शिवणकर, ग्राम पंचायत सदस्य मिनाक्षी विठ्ठले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

विशेष म्हणजे मागील 4 वर्षा पासून सौंदड ग्राम पंचायत आपल्या विविध प्रकारच्या नवीन उपक्रमांसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. यासाठी गावकऱ्यांसह युवा नेटवर्क समूहाचे विशेष योगदान लाभत असून गावाची आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून पुरस्कार मिळाल्याने गावाच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे हे विशेष! या विशेष कामगिरी साठी सौंदड ग्राम पंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • यशाचे श्रेय गावकऱ्यांना

सौंदड गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आमचे परिश्रम निरंतर सुरू आहे. यात संपुर्ण गावकऱ्यांचा आम्हाला वेळोवेळी सहयोग लाभत असल्यानेच हे सर्व साध्य होत आहे. हा केवळ ग्राम पंचायतीचा सन्मान नसून सौंदड गावच्या प्रत्येक घटकाचा सन्मान आहे. यशाचा शिलेदार येथील प्रत्येक नागरिक असून हा पुरस्कार आम्ही गावकऱ्यांच्या परिश्रमाला समर्पित करीत आहोत. – गायत्री ईरले, सरपंच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!