AGM News24

Latest Online Breaking News

देशातील छोट्या शहरांना विमान सेवेशी जोडणार : मंत्री सिंधिया

गोंदिया येथून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरु

AGM न्यूज 24,गोंदिया

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 13 मार्च 2022 ला इंदौर (मध्यप्रदेश) येथून इंदौर ते गोंदिया व गोंदिया ते हैद्राबाद व्यवसायिक यात्री विमान वाहतूक सेवेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. गोंदिया-इंदौर-हैद्राबाद या तीन राज्यांना जोडणारी विमानसेवा आजपासून प्रारंभ झाल्याने जिल्हा वासीयांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. या विमान सेवेचा लाभ महाराष्ट्रासह लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील प्रवाशांना सुध्दा होणार आहे. या सेवेपासून छोटे-छोटे शहर मोठ्या शहरांशी जोडले जाणार, असे प्रतिपादन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज दि.13 मार्च रोजी इंदौर येथे आयोजित आभासी पध्दती कार्यक्रमाच्या माध्यमातून केले.

मंत्री सिंधिया पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान यांनी देशातील अनेक शहरात यात्री विमान सेवा सुरु केली आहे. नुकतेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुरक्षित स्वदेशात आणण्याचे कार्य भारतीय नागरी उड्डयन मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, तत्कालीन नागरी उड्डयन मंत्रीप्रफुल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथे पायलट प्रशिक्षणकेंद्र व विमानतळाची बांधणी केल्यामुळे आज व्यवसायिक विमान सेवेचा लाभ गोंदिया वासियांना मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यात यात्री विमान सेवेसह भविष्यात कार्गो सेवा सुध्दा सुरु करण्यात येईल, याचा लाभ तीन राज्यातील विविध शहरांना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गोंदिया येथील बिरसी विमानतळावर खासदार सुनिल मेंढे यांनी गोंदिया ते हैद्राबाद प्रवासी विमान वाहतूक सेवेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी श्री मेंढे म्हणाले की, जिल्हावासियांची अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेली व्यवसायिक विमान सेवेची मागणी आजपासून सुरु झाल्यामुळे अनेक नागरिकांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. तसेच भविष्यात गोंदिया ते मुंबई विमान सेवा देखील सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यापासून गोंदिया-इंदौर-हैद्राबाद-गोंदिया ही सेवा सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील रोजगाराला देखील चालना मिळणार आहे.

सदर कार्यक्रमात खासदार अशोक नेते, बालाघाट (मध्यप्रदेश) खासदार ढालसिंग बिसेन, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, माजी आमदार सर्वश्री राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल, केशवराव मानकर, रमेशकुथे, हेमंत पटले, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, नागरी विमान वाहतूक अवरसचिव उषा पाडी, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, कार्यकारी उपाध्यक्ष सी.एस.रंधावा, बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक के.व्ही.बैजू, फ्लाय बिग कंपनीचे हेडग्राउंड ऑपरेशन रतन आंभोरे, बिरसी गावचे सरपंच व पृथ्वीसिंग नागपूरचे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे व फ्लाय बिगविमान वाहतूक कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांचेसह जिल्ह्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!