AGM News24

Latest Online Breaking News

खासदार क्रिडा महोत्सवाचे भव्य उद्घाटन

क्रीडा सोबतच सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रातही काम करा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भंडारा, दिनांक.4 : खेळातून व्यक्तीमत्व आणि नेतृत्व तयार होते. क्रीडांगणावर देशाचा खरा नागरिक घडतो. जनतेची कामे करतानाच क्रीडा क्षेत्रात क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आपण घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. क्रीडा क्षेत्राप्रमाणेच शिक्षण आणि आरोग्य यातही काम करण्याची गरज आहे. आपण ते करावे, मी सर्वतोपरी तुमच्या पाठीशी आहे. अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदारांसह भंडाऱ्यातील जनतेला आश्वस्त केले.

खा. सुनील मेंढे यांच्या वतीने खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन भंडारा-गोंदिया जिल्ह्यात करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. भंडारा शहरातील रेल्वे मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या वेळी व्यासपिठावर आ.डॉ.परिणय फुके, भाजपचे जिल्हाध्यक्ष मा.शिवराम गिर्हेपुंजे, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष मा.केशव मानकर, माजी खा. शिशुपाल पटले, माजी आ.रामचंद्र अवसरे, मा.बाळा काशिवार, मा.गोपाल अग्रवाल, मा.खोमेश रहांगडाले, मा.संजय पुराम, डॉ.हेमकृष्ण कापगते, मा.हेमंत पटले, मा. बाळा अंजनकर, मा.प्रदीप पडोळे, सौ.रचना गहाणे,सौ.धनवंता राऊत, मा.ओम कटरे, मा.तिलक वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते विधानसभा निहाय झालेल्या क्रिकेट आणि कब्बड्डी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. सोबतच तेजोनिधी ज्योतिर्मय यात्रा करणाऱ्या भंडाऱ्यातील सौ.शुभांगी मेंढे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा नितीनजी गडकरी यांनी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. प्रो कबड्डी स्पर्धेत जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या आकाश पिकलमुंडे यांच्याही यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक खा. मेंढे यांनी केले. बायपास मार्गासाठी त्यांनी नितीनजींचे आभार मानले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना गडकरी यांनी क्रीडा महोत्सवात शंकरपटाचा सहभाग केल्याबद्दल खासदारांचे कौतुक केले. हा नविन आणि अभिनव प्रयोग केल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मान वाढला असेही ते म्हणाले. भविष्यात स्पर्धा आणि त्यासाठी लागणाऱ्या खेळाचा मैदानाचा विकास करण्याकडेही लक्ष द्यावे, असेही गडकरी यांनी सांगितले. अनाथ आणि दिव्यांगांसाठी क्रीडा क्षेत्रात नविन प्रयोग करण्याच्या दृष्टीन प्रयत्न व्हावे असे सांगताना शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातही प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

क्रीडा महोत्सवासोबत भविष्यात सांस्कृतीक महोत्सवही आपण घ्यावा, त्यासाठी चांगल्या कार्यक्रमांचे नियोजन करून देण्यास आपण सदैव सोबत असू असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चैतन्य उमाळकर यांनी केले. कार्यक्रमाला संपूर्ण लोकसभा मतदार संघातून क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!