AGM News24

Latest Online Breaking News

शिवभोजन केंद्रावरील गैर प्रकार खपवून घेणार नाही; छगन भुजबळांचा इशारा

पुणे, दि. १३ फेब्रुवारी २०२२ – पुणे येथे आज अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने,अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, वैधमापन विभागाच्या सहनियंत्रक सीमा बैस,परिमंडल अधिकारी गिरीष तावले, प्रशांत खताळ, चांगदेव नागरगोजे आदी उपस्थित होते .

शिवभोजन केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही. शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित केंद्रांना प्रथम वेळी कारणे दाखवा नोटीस द्या दुसऱ्यांदा देखील गैरप्रकार केल्यास मोठया रकमेचा दंड करावा आणि पुन्हा तिसऱ्यांदा गैरप्रकार आढळल्यास सदर आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी, असे निर्देश दिले.

राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करा, अशा सूचनाही यंत्रणेला दिल्या. शिवभोजन केंद्र देताना दिव्यांग तसेच महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाते, या माध्यमातून अधिकाधिक गरजू महिलांना रोजगार मिळू शकेल

पुणे शहर तसेच जिल्ह्यात दक्षता समित्यांची गतीने स्थापना करावी, जिल्ह्यात धान्याचा उपयोग संपुर्ण क्षमतेने करा.धान्याच्या दर्जाबाबत तक्रारी येता कामा नये अशा सूचना केल्या. पुणे जिल्ह्यात ५% धान्याची बचत होत असल्याने यामधून इतर पात्र सुमारे वीस हजार कार्ड धारकांना अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या.गरजु तसेच नियमात बसत असेल त्याला शिधापत्रिकेचे वितरण करण्याचे आदेश दिले.

ई पॉस मशीनचा वापर करतांना अनेक तक्रारी येत असल्याने काळानुरूप त्यात बदल करण्यात यावेत अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली. त्यावर ई-पॉस मशीनमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत विचार करण्यात येईल.मात्र याबाबत आलेल्या तक्रारी दुर करण्याचा प्रयत्न करा. आधार जोडणी वाढविणे, कल्याणकारी संस्थांचे नियमन, पुणे जिल्ह्याचा आयएसओ उपक्रम आदीबाबत आढावा घेतला. तसेच साठवण क्षमता वाढविण्यासाठी गोदाम उभारणीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी पुणे जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!