AGM News24

Latest Online Breaking News

श्री अंचलेश्वर मंदिर परिसराचा विकास केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेच्या माध्यमातून करणार

  • केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्वासन

चंद्रपुर :- शहराचा धार्मिक मानबिंदु असलेल्या ऐतिहासिक श्री अंचलेश्वर मंदिराचा समावेश भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या प्रसाद योजनेत करण्याचे आश्वासन भारत सरकारचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री जी.किशन रेड्डी यांनी माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री अंचलेश्वर मंदिर परिसराच्या विकास आराखड्याला मान्यता मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री श्री किशन रेड्डी यांच्याशी चर्चा केली , या चर्चेदरम्यान श्री रेड्डी यांनी सदर आश्वासन दिले.

या चर्चे दरम्यान आ. मुनगंटीवार म्हणाले , चंद्रपुर शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे.हे शहर गोंड़कालीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. श्री अंचलेश्वर मंदिर , माता महाकाली मंदिर यासह गोंडराजाद्वारे निर्मित किल्ला व चार प्रवेशद्वार या शहराचे ऐतिहासिक आकर्षण आहे. मजबूत किल्ल्यांचे परकोट, राजवाड़ा, श्री महाकाली व श्री अंचलेश्वर मंदिर या वास्तुमुळे या शहराला ऐतिहासिक व धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. या शिवमंदिराचे महत्व विशेष आहे.राजा खांडक्या बल्लारशाह या गोंडराजाच्या अंगावरील फोडं एका कुंडातील पाणी प्राशन केल्याने बरे झाले म्हणून या ठिकाणी एक मंदिर उभारण्यात आले.पुढे राणी हिराई या कर्तबगार राणीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला, बाहेरील भाग शिल्पांनी सजविला. याच परिसरात राजा विरशाह यांच्या आकर्षक समाधीचे बांधकाम राणी हिराईने केले. मात्र आज या मंदिर परिसराची दुरावस्था झाली आहे. बुरुज ढासळले आहे.प्रकाश व्यवस्थेचा अभाव आहे. शहराच्या या धार्मिक व ऐतिहासिक मानबिंदुच्या विकासासाठी स्वतंत्र आरखडा तयार करून निधी उपलब्ध करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री श्री किशन रेड्डी यांच्याकड़े केली.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 2014-15 मध्ये देशातील चिन्हित तीर्थक्षेत्राच्या समग्र विकासासाठी तीर्थयात्रा कायाकल्प व आध्यात्मिक संवर्धन याकरिता राष्ट्रीय मिशन सुरु केले होते.2017 मध्ये या योजनेचे नाव बदलून प्रसाद मिशन करण्यात आले. श्री अंचलेश्वर मंदिराचा विकास प्रसाद मिशन मध्ये करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!