AGM News24

Latest Online Breaking News

पहिल्या टप्प्याच्या उद्दिष्टपूर्तीनंतर दुसऱ्या टप्प्यातही बांधणार ५ लाख घरे

गोरगरीब जनतेला मिळणार हक्काचे छत

मुंबई, वृत्तसेवा दि. ३ फेब्रुवारी २०२२ : स्वतःचे हक्काचे एक घर असावे, ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ५ लाख घरे बांधण्याची उद्दिष्टपूर्ती केल्यानंतर आता याच अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

  • दुसऱ्या टप्प्याचे स्वप्न.

महाआवास अभियान २.० मधील ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ३१ मार्च २०२२ पर्यंत बांधण्याचा दृढनिश्चय करूया, अशा सूचना केल्या. महाआवास अभियान 2.0 ची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ग्रामविकास विभागाचे सहसचिव मंगेश मोहिते, राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) संचालक डॉ.राजाराम दिघे, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपसंचालक निलेश काळे, राज्य ग्रामीण योजनेचे उपसंचालक श्रीमती मंजिरी टकले तसेच राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपआयुक्त, प्रकल्प संचालक, गट विकास अधिकारी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

  • कोरोना असूनही पहिला टप्पा वेळेत पूर्ण.

कोरोना काळ असतानाही महाआवास अभियानाचा पहिल्या टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. अनेक वर्षापासून बेघर आणि गरजू लोकांची यादी तयार करण्यात आली होती, मात्र त्यांना घरे मिळत नव्हती. या गरजू लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ही मोहीम राबविण्यास आपण सुरूवात केली. या मोहिमेमुळे वेळेत घरे तयार करण्याची जिद्द आणि जागृती अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 5 लाख घरे बांधण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे.

  • दुसऱ्या टप्प्यात गुणात्मक आणि संख्यात्मक बदल.

महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गुणात्मक व संख्यात्मक बदल करण्यात आला असून त्यात लॅंड बॅंक, सॅंड बॅंक, बहुमजली गृहसंकुले या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. मंजुरीनंतर पहिला हप्ता वितरीत करण्याचा कालावधी 37 दिवसांवरून 7 दिवसांवर आणावा, मंजुरीनंतर घरकुले वेळेत पूर्ण करावीत, प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित मंजुरी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, भूमीहिन लाभार्थ्यांना तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही यावेळी केल्या.

  • वेग वाढवण्याच्या सूचना.

घरकुलाला अधिक गती मिळावी यासाठी केंद्रीय ग्रामविकास विभागाने ‘ड’ प्लस यादीला मान्यता दिली असल्याने 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यास 100 टक्के घरकुलांना मंजुरी देण्यात यावी. नाविन्यपूर्ण घरे बांधण्याचे जे काम अपूर्ण आहेत, ती कामे जलदगतीने पूर्ण करावीत आणि लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!