AGM News24

Latest Online Breaking News

नगरपंचायतचा निकाल आगामी निवडणूकांतील भाजपच्या विजयाची नांदी ठरणारा – पंकजाताई मुंडे

● नवनिर्वाचित नगरसेवकांचा अंबाजोगाईत पार पडला हृदय सत्कार

केंद्र सरकारच्या कामाचे आयते श्रेय घेण्यापेक्षा स्वतःच काहीतरी आणून दाखवा – सत्ताधाऱ्यांना टोला

अंबाजोगाई ।दिनांक २७।जिल्हयात नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणूकीत भाजपला जे घवघवीत यश मिळालं आहे ते पुढील प्रत्येक निवडणूकीतील विजयाची नांदी ठरणारे आहे. ही विजयाची सुरवात आहे, आगामी प्रत्येक निवडणुकीत असेच यश दिसून येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या कामाचे आयते श्रेय घेण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी आणून दाखवा असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला.

बीड जिल्हयातील आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, येथील नगरपंचायत निवडणूकीतील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार तसेच दीनदयाळ नागरी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार आज अंबाजोगाई येथे आ. नमिताताई मुंदडा यांच्या निवासस्थानी संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, आ. सुरेश धस ,आ. नमिताताई मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, मोहनराव जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, भाजपला नगरपंचायत निवडणूकीत चांगले यश मिळाले आहे, हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निकालाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य निर्माण झाला आहे. आज सर्वांचे फेटे पाहून आनंद होतोय. ही आपल्या विजयाची सुरवात आहे, आपण बेरजेचं राजकारण करतोयं त्यामुळे पुढील प्रत्येक निवडणूकीत असेच यश मिळेल, त्या जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावू, त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. तुमच्या सर्वांच्या बळावर जिल्हयात पुन्हा विजयश्री खेचून आणू.

स्वतःच काहीतरी आणून दाखवा—————

राज्यात आज आम्ही विरोधी बाकावर आहोत, पण केंद्रात आपले सरकार आहे असं सांगून पंकजाताई यांनी जिल्हयातील सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले. त्या म्हणाल्या, दोन अडीच वर्षे तुमच्या सर्व गोष्टी सहन केल्या. पण आता गप्प बसणार नाही. जनतेच्या हिताचं काम केलं तर तुमचा जाहीर सत्कार करू पण स्वतःच्या मुठभर कार्यकर्त्यांची पोटं भरण्यासाठी करणार असाल तर ते सहन केलं जाणार नाही. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग ही केंद्राची कामं आहेत, तुम्ही पत्र दिली असतील, आम्ही पण राज्यात सीएम ला पत्र देतो, पण पाठपुरावा कुणी केलाय हे महत्वाचं असतं. जनता बोलते तेव्हा इतरांची तोंडं बंद होतात. कामं कुणी केलीत हे त्यांना माहित आहे. केंद्र सरकार मार्फत आम्ही प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे, ते जनता जाणून आहे त्यामुळे आमच्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा स्वतःच काहीतरी आणून दाखवा. जिल्हा आज कोणत्या वाटेवर गेलाय, आम्ही त्यासाठी तुम्हालाच प्रश्न विचारणार? नसेल तर मला अधिकार नाहीत हे एकदा जाहीर करून टाका असं पंकजाताई म्हणाल्या.

विजयाची घोडदौड निरंतर ठेवू ; खा.प्रितमताई मुंडे—–

यावेळी बोलतांना खासदार डॉ.प्रितमताई मुंडे म्हणाल्या,नगर पंचायत निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात मिळलेले यश भाजपच्या विजयाचे प्रतीक आहे,विजयाची ही घोडदौड निरंतर सुरू ठेवून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ही यश मिळवू असा विश्वास खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या निधीचे श्रेय लाटणारांना चांगलेच फटकारले. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणला,त्याची कामे आजही सुरू आहेत.परंतु काही आमदारांनी केंद्राच्या निधीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालवला आहे,केंद्र सरकारच्या निधीचे उदघाटन देखील आमदार करत आहेत.केंद्र सरकार आमदारांना कधीपासून निधी द्यायला लागले ? आम्ही केलेल्या पाठपुराव्यानंतर विरोधक पाठपुरावा केल्याचे पत्र टाकत असतात,आमच्या अगोदर पाठपुरावा केलेल्या तारखेतील पत्र दाखवा असे आव्हान ही त्यांनी श्रेयवाद्यांना दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते अक्षय मुंदडा यांनी केले. यावेळी आ.धस, आ.मुंदडा, राजेंद्र मस्के यांची भाषणे झाली. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पार पडला. दीनदयाळ बँकेचे नुतन अध्यक्ष मकरंद पत्की, उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख व संचालकांचा देखील पंकजाताईंनी यावेळी सत्कार केला. कार्यक्रमास सर्वश्री भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे, बाबरी मुंडे, अच्युत गंगणे, भगवान केदार, सतीश मुंडे, विजयकांत मुंडे तसेच भाजपचे जिल्हयातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!